- पोलिसांकडून आरोपी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- १५ जुलै रोजी सायंकाळी माण-महाळुंगे रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात एक अनोळखी मृतदेह आढळला. त्याची ओळख पटली नव्हती. डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. त्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी हिंजवडी पोलिसांची दोन पथके तयार केली.
पथकांनी कौशल्याने तपास करून आरोपी निष्पन्न केले. आरोपी आणि मयत हे एकत्र दारू पीत होते. एकाकडून दारूचा ग्लास सांडला. त्या कारणावरून आरोपीने काठीने, दारूच्या बाटलीने तोंडावर, डोक्यावर तसेच शरीराच्या विविध भागात मारहाण करून तरुणाचा खून केला असल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून कचरा टाकणाऱ्या गाडीची ओळख पटवून पोलिसांनी चालकालाही अटक केली. कंट्रीबार येथे काम करणाऱ्या दोघांनी कचऱ्यासोबत तरुणाचा मृतदेह देखील गाडीत भरला असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुरावा नष्ट केल्याची कलमवाढ करण्यात आली. नीलेश सतीश धुमाळ, राजेंद्र थोरात अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मयताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे नाव बालाजी असून तो नांदेड येथील असल्याचे तपासातून समोर आले आहे. बालाजी हा पिंपरी-चिंचवड परिसरात फिरस्ती होता.