- ६ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चितीचा कालावधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि. ३) जाहीर झाली. सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.
पहिल्या प्रवेश फेरीला २५ जुलैपासून सुरुवात झाली. बुधवारी (दि. ३) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून ४२ हजार ७०९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये ६ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करायचे आहेत. पुणे, पिंपरी – चिंचवडमधील प्रवेश प्रक्रियेसाठी ८६ हजार ५८६ जागा असून, त्यासाठी ६९ हजार १२५ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. पसंतीनुसार महाविद्यालय मिळाल्याने काही मुलांना आनंद झाला आहे.
पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. जर मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर ते पुढील फेरीची वाट पाहू शकणार आहेत; मात्र ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे. त्यांनी तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किवा प्रवेश नाकारला गेला तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार आहे. कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी धडपड करावी लागेल.















