न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२२) :- केएफसी रेस्टॉरंटची फ्रेंचाइजी घ्यायची असल्याने फिर्यादीने ऑनलाईन फॉर्म भरला होता. त्यानंतर कागदपत्रांची यादीसह फॉर्म भरून info@kfcfranchise.co.in या मेल आयडीवर मेल पाठवला. त्यांचा फॉर्म ऍड्रेस नॉट फाऊंड या शे-याने रिजेक्ट झाला. त्यानंतर एका व्यक्तीने मेसेज करून फिर्यादी यांना पुन्हा फॉर्म पाठवण्यास सांगितला.
एका व्यक्तीने फिर्यादींना लेटर ऑफ इन्टेन्ट पाठवले. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर २४ तासात एक लाख ५५ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादींनी ती रक्कम भरली. त्यांनतर एनओसी घेण्यासाठी सात लाख ७५ हजार ५०० रुपये मागितले. फिर्यादीने ती रक्कमही बँक खात्यावर जमा केली. त्यानंतर फिर्यादींना लायसन्ससाठी १९ लाख ७५ हजार रुपयांची मागणी झाली. याचा फिर्यादींना संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याची विनंती केली. मात्र त्यांना वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन आरोपींनी भेटणे टाळले. तसेच फिर्यादीची नऊ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली.
ही घटना १४ जून ते १८ जुलै या दरम्यान सारस्वत बँक, आकुर्डी येथे घडली. प्रशांत नंदकिशोर गुंजोटे (वय ३७, रा. चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. ५) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार info@kfcfranchise.co.in या मेलचा वापरकर्ता, बँक खाते धारक, आदित्य अगरवाल, सुमित (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















