न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२२) :- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे सेक्टर १२ येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी हा गृहप्रकल्प आहे. यातील सदनिकासाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्याची सोडत मे २०२१ मध्ये काढली होती. या सोडती अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना तात्पुरते वाटपपत्र देण्यात आले. लाभार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी झाली आहेत. सप्टेंबर महिन्यात शेवटचा हफ्ता भरल्यानंतर सदनिका वाटपाचे काम होणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी ५५ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या तर अल्प उत्पन्न गटासाठी ४९.२७ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या सदनिका उपलब्ध होतील. गृहसंकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी १४० दुकानांची योजना प्रस्तावित आहे. हा प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाईन रस्त्याजवळ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ असून, ११ मजल्याच्या एकूण ४५ इमारतींचे बांधकाम सुरु आहे. त्यातील काही इमारतीचे कामे अपूर्ण आहेत.
प्राधिकरणाचे विलगीकरण पीएमआरडीएमध्ये झाल्याने कागदपत्रे पडताळणी, वाटपपत्रांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या सदनिकांच्या सोडती २१ मे २०२१ ला झाल्या होत्या. लाभार्थ्यांना तात्पुरते वाटपपत्रही मेलवर देण्यात आले. कागदपत्रे पडताळणीनंतर १० टक्के रक्कमही भरली. हप्ता भरण्याचा टप्पा हा ऑगस्ट अखेरीस आहे. जुलैपर्यंत सदनिकाचा ताबा मिळणार, असे सांगण्यात आले. मात्र अजूनही प्रतीक्षाच आहे.
सेक्टर १२ मधील सदनिकाधारकांचा अखेरचा हप्ता जमा झाला की ताबा वाटप करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या किवा तिसऱ्या आठवड्यात या प्रक्रियेस सुरुवात होईल.
मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए…