न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२२) : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतलेल्या गणेशोत्सव-२०१९ स्पर्धेत भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच सात मंडळांना ‘जय गणेश भूषण पुरस्कार’ जाहीर झाला. बक्षिस वितरण गुरुवारी (दि. १८) पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे यांनी शनिवारी निकालाची घोषणा केली. स्पर्धेत १२९ मंडळांनी भाग घेतला होता. त्यामधून १०९ मंडळे बक्षीसासाठी पात्र ठरली. त्यांना १३ लाख १ हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत चिंचवड स्टेशन येथील यशस्वी मित्र मंडळ, जाधववाडी-चिखलीतील सुभाष मंडळ, आकुर्डी गावठाणातील नागेश्वर मंडळ आणि चिंचवडगावातील अखिल मंडई मंडळ यांना दुसरा ते पाचवा क्रमांक मिळाला.
सातत्याने पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येणाऱ्या सात मंडळांना जय गणेश भूषण पुरस्कार आणि १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन स्पर्धेतून निवृत्त केले जाणार आहे. त्यामध्ये भोसरी लांडगे आळीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम, निगडी गावठाणातील जय बजरंग, निगडी, प्राधिकरणातील जय हिंद, चिंचवड येथील एस. के. एफ., गांधीपेठ, काळभोरनगर येथील राष्ट्रतेज आणि भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम या मंडळांचा समावेश आहे.