नवीन आयुक्तांची भेट अखेर झालीच नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर नवनियुक्त आयुक्त म्हणून शेखर सिंह बुधवार (दि. १७) रोजी पदभार स्वीकारणार असल्याची दिवसभर चर्चा सुरू होती. रात्री आठ वाजेपर्यंत आयुक्त पाटील हे सिंह यांची वाट पहात कार्यालयात थांबले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत सिंह यांचे आगमनच झाले नाही. अखेर आयुक्त पाटील कंटाळून रवाना झाले.
दरम्यान पाटील यांच्या बदलीला स्थगिती मिळाल्याच्या चर्चानाही यामुळे बळ मिळत होते. ओडिशा केडरचे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने महापालिका आयुक्तपदी १५ फेब्रुवारी २०२१ मध्ये नियुक्ती झाली होती. पाटील यांची दीड वर्षांत बदली केली आहे. त्यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली. त्यांच्या जागी साताऱ्याचे माजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती केली आहे. नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह बुधवारी उशिरा महापालिकेत येणार असून पदभार स्वीकारणार असल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरू होती. दै आयुक्त यांना भेटण्यासाठीही अधिकारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पिंपरी – चिंचवड महापालिकेत दीड वर्षाच्या अल्प कालावधीत खूप काही करता आले. नागरिकांचे प्रेम आणि अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली. नवनवीन संकल्पना राबविल्या. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शहरातील कामांतून खूप प्रेम आणि दांडगा अनुभव मिळाला. त्या आठवणीतून एखादे पुस्तक लिहिता येऊ शकते. बदलीविरोधात मी ‘ मॅट’मध्येही जाणार नाही. – राजेश पाटील, आयुक्त पिं. चिं. मनपा…


















