न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२२) :- हिंजवडीतील लक्ष्मी चौकात रविवारी सकाळी अकरा वाजता फिर्यादी महिला भाजीपाला आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी महिला त्यांच्याजवळ आली. तुमच्याकडे किती सोने आहे? असे त्या महिलेने विचारले. फिर्यादी महिलेने एक तोळ्याचे दागिने असल्याचे त्यांना सांगितले.
त्यानंतर एक ६० वर्ष वय असलेली महिला फिर्यादीजवळ आली. तिने तिच्याकडे असलेल्या पिशवीत मूठभर सोन्याचे मणी असल्याचे दाखवले. त्यानंतर तुमच्याकडील एक तोळे दागिन्यांच्या बदल्यात दोन तोळे सोने देण्याचे आमिष दाखवून दोघींनी फिर्यादीला रिक्षातून डांगे चौक येथे नेले.
त्यानंतर फिर्यादीकडून ३० हजारांचे सोन्याचे दागिने घेतले आणि दोन तोळे सोन्याचे दागिने म्हणून चलाखीने वाळू असलेली पिशवी देत फसवणूक केली. महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन महिलांविरोधात तक्रार दिली आहे.हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
















