न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- शहरात रस्त्याच्या कडला लावलेल्या हॉगिंग लीटर बिन्समध्ये कचरा ओसांडून आजूबाजूला पसरल्याने अस्वच्छता पसरत आहे. याला रोख लावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्या रस्त्यावरील पानपट्टीवाले, विक्रेते, फेरीवाले व टपरीचालकाचे साहाय्य घेण्यात येणार आहे. बिन्स कचऱ्याने भरल्यानंतर आरोग्य विभागाच्या क्रमांकावर ते विक्रेते एसएमएस करून कळविणार आहे. त्यानंतर तत्काळ घंडागाडीतून कचरा उचलून नेण्यात येणार आहे. नव्या कामकाजाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
महापालिकेने इंदूर शहराप्रमाणे शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. शहरातील सर्व ४५० कचराकुंड्या रातोरात हटविण्यात आल्या. घरा-घरातून त्याला सक्तीने सुका कचरा वेगळा घेण्यात येत आहे. कचराकुंड्या नसल्याने नागरिकांना व वाहनचालकांना कचरा टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला शेकडो हॅगिंग लीटर बिन्स उभारले आहेत. विशेषत: दापोडी ते निगडी जुन्या महामार्गावर आणि सांगवी फाटा ते किवळे या मार्गावर लीटर बिन्स लावण्यात आले आहेत. हे बिन्स सीएसआर निधीतून उपलब्ध झाले आहेत. कचराकुंड्या नसल्याने काही रहिवाशी व दुकानदार त्या हॅगिंग लीटर बिन्समध्ये कचरा टाकतात. त्यामुळे बिन्स कचऱ्याने ओसंडून वाहत असतात. त्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.
कचरा गोळा करण्यास घंडागाडी येईपर्यंत कचरा सर्वत्र पसरलेला असतो. त्यावर उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने रस्त्यांवरील टपरीवाले, विक्रेते, पथारीवाले, पानपट्टीवाले आदीचे सहाय घेण्यात निर्णय घेतला आहे. बिन्स कचऱ्याने भरल्यानंतर त्या विक्रेत्याने आरोग्य विभागाच्या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तत्काळ पालिकेचे वाहन येऊन बिन्समधील सर्व कचरा भरून नेणार आहे. त्यामुळे स्वच्छता कायम राहणार आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर दापोड़ी ते निगडी आणि सांगवी फाटा ते किवळे या मार्गावर राबविली जाणार आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ती योजना सर्व शहरात राबविली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.















