न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गासाठी अत्याधुनिक ऑपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) रेंजहिल येथे उभारण्यात आले आहे. हे सेंटर येत्या १५ दिवसांमध्ये कार्यान्वित होणार असून, या ठिकाणाहून दोन्ही मार्गावरील मेट्रोवर नियंत्रण व नियोजन करण्यात येणार आहे.
मेट्रोच्या भुयारी मार्गासह वनाज ते सिव्हील कोर्ट आणि फुगेवाडी ते दापोडी या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रोच्या रिच वन व रिच टू मार्गासाठीचे महामेट्रोकडून ऑपरेशन कंट्रोल सेंटर रेंजहिल येथील डेपोत उभारण्यात आले आहे. या ठिकाणाहूनच मेट्रो मार्ग, स्टेशन, मेट्रोचे सर्व नियोजन व नियंत्रण केले जाणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये चोवीस तास तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहून मेट्रो मार्ग, सुरक्षेच्या संदर्भातील सीसीटीव्हीवर नजर ठेवणार आहेत. मेट्रो स्टेशन, मेट्रो गाडीमध्ये काही बिघाड झाल्यास त्याची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला कळणार आहे. त्या ठिकाणी बसून सर्व तांत्रिक अडचणी दुरुस्त करता येणार आहेत. नियंत्रण कक्षात काम करणाऱ्यांसाठी एक स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी) बनविली आहे. त्याच्या माध्यमातून काम केले जाईल, अशी माहिती मेट्रोचे संचालक (सिस्टम व ऑपरेशन्स) विनोद अगरवाल यांनी दिली. यावेळी मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, अरुण धरमीक, पी. एस. मीना, संतोष कुमार, राजीव कुमार, राजेश दवीवेदी उपस्थित होते.
नियंत्रण कक्षाची वैशिष्ट्ये…
मेट्रोचे संपूर्ण काम ऑटोमेटिक चालणार आहे. मेट्रोत एक चालक असेल. पण, त्याला फक्त ट्रेन चालू करणे हेच काम असेल. बाकीचे सर्व काम ऑटोमेटिक चालेल. गाडीवर संपूर्ण नियंत्रण कक्षातून केले जाईल. वेग, स्थानकावर थांबणे, दरवाजे उघडणे हे सर्व कक्षातून होणार आहे. काही अडचण आल्यास त्याची माहिती तत्काळ कक्षात समजेल.















