न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात घरोघरी आज शनिवारी पारंपरिक पद्धतीने उत्साहात गौराईचे आगमन झाले. सकाळपासूनच घरोघरी गौराई आगमनाची लगबग सुरु होती.
सुहासिनींनी वाजत गाजत गौराईला घरी आणले. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची पूजा करून स्वागत केले. त्यानंतर शालू, पैठणी यासह विविध अलंकार परिधान करून गौराईचा शृंगार केला. घरात विधिवत पूजन, आरती करून वैविध्यपूर्ण पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. घराघरांत गौराईच्या स्वागतासाठी नावीन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यावर भर दिला.
दरम्यान, यंदा भाद्रपद शुद्ध सप्तमीला आगमन झाले असून, अष्टमीला पूजन व नवमीला विसर्जन होणार आहे. आगमन ते विसर्जन हा तीन दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.















