न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पाच शाळांमध्ये सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पौष्टिक आहार पुरविण्यात येतो. मात्र, या बचत गटामार्फत पुरविण्यात येणारा आहार हा बेचव असल्याच्या पाचही शाळेमधून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिकेच्या शिक्षण विभागाने या बचत गटाला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शहरातील विविध बचत गटांना पौष्टिक आहार म्हणून वरण – भात आणि आठवड्यातून एकदा पूरक आहार दिला जातो. चिंचवड स्टेशन परिसरातील दोन, मोहननगरमधील दोन, आणखी एक अशा पाच शाळांमध्ये बचत गटाला पौष्टिक आहार पुरविण्याचे कामकाज देण्यात आले आहे.
मात्र, या बचत गटाच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी पाण्यासारखे वरण आणि चव नसलेला भात पुरविल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिकेच्या शिक्षण विभागाने या बचत गटाला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.















