- तब्बल दोन हजार जणांवर उगारला प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. भांडण करणाऱ्या आरोपीकडून यापुढ भांडणार नाही. जुगाऱ्याकडून जुगार खेळणार नाही, असे बंधपत्र घेतले जात आहे. पिंपरी – चिंचवड पोलिसांनी तब्बल दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे उपद्रवी तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपी व गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
गणेशोत्सवात कोठे गडबड गोंधळ होऊ नये, कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्सवकाळात वादविवाद करणाऱ्यांपासून ते अवैध धंद्या, चोऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वाँच आहे. वचक निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.
स्वयंसेवकांना २४ तास सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्याच्या सूचना आहेत. मिरवणूक शांततेत होण्यासाठी पोलिसांकडून तयारी सुरू आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. सराईतांना ताब्यात घेत चौकशी केली जाते. तसेच वॉरेट बजावण्यात येत आहेत. काही उपद्रवींवरही कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही.
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. बंदोबस्तासाठी जादा कुमक मागविली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
– अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी – चिंचवड…















