- ७ ते ११ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज; १२ सप्टेंबरला प्रवेश यादी जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२२) :- राज्यात शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून प्रवेशांसाठी एक लाख ५० हजार ११६ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी एक लाख पाच हजार ६७२ जागांवर आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थी आणि आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी पुरवणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी ७ ते ११ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. शासकीय आणि खासगी आयटीआयमधील जागा समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. तर, ११ सप्टेंबरला प्रवेश फेरीसाठीच्या उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, १२ सप्टेंबरला प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उपस्थित विद्यार्थ्यांतून संस्थास्तरावर गुणवत्ता यादी १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जाहीर करण्यात येईल. याच कालावधीत विद्यार्थ्यांना समुपदेशानासाठी बोलावून प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येणार आहे.















