न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी घरगुती गणरायाला भाविकांनी भक्तीपूर्ण निरोप दिला. महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात मूर्ती विसर्जन करून शहरवासीयांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवली.
विघ्नहर्ता गणेशाची यंदा घरोघरी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस रंगणाऱ्या भक्तीच्या या मेळ्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे. गणरायाची मनोभावे पूजाकरून भक्तांनी घरगुती बाप्पांना निरोप दिला. महापालिकेकडून कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात सकाळी सात वाजल्यापासून नागरिक मूर्ती विसर्जनासाठी येत होते. सायंकाळी पाच नंतर शहरातील काही सार्वजनिक मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. गणेश भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करण्यात आला. या जयघोषाने परिसर दुमदुमून गेली.
पवना नदीत पाणी जास्त असल्याने जाधव घाट तसेच चिंचवडमधील विसर्जन घाटांवर लोखंडी संरक्षित जाळ्या लावण्यात आल्या होत्या. वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये याचे चोख नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे मिरवणूक सोहळ्यात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. घाटांवर विविध संस्थांकडून मूर्तीदानचे आवाहनही करण्यात येत असून त्यास गणेशभक्तांकडून प्रतिसादही उत्तम मिळत आहे.
















