न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी भाजपकडून राबविण्यात येणाऱ्या ‘ लोकसभा प्रवास ‘ योजनेतंर्गत केंद्रीय अदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग या शिरुर लोकसभा मतदारसंघात १४ ते १६ तारखेदरम्यान तीन दिवसांचा दौरा करणार आहेत, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संयोजक अॅड धर्मेंद्र खांडरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके, माजी सदस्य शरद बुट्टे – पाटील आदी उपस्थित होते.
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, देशभरातील १४४ लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये राज्यातील १६ मतदारसंघाचा समावेश आहे. त्या अंतर्गत १४ तारखेला शिरूर मतदारसंघाचा दौरा होणार आहे. या कालावधीत पहिल्या दिवशी भोसरी, आळंदी आणि मंचर येथे रेणुका सिंग येणार आहेत. त्यानंतर दौऱ्यात दुसऱ्या दिवशी भीमाशंकर, ओझर, नारायणगाव, शिक्रापूर येथे तर, तिसऱ्या दिवशी उरळीकांचन हडपसर आणि पुणे येथे त्या असणार आहेत. हे मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे.















