- पालिका आयुक्त सिंह यांच्या भेटी दरम्यान अधिकाऱ्यांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या निगडीतील टिळक चौक येथील कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरची आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी रविवारी (दि. ११) प्रथमच पाहणी केली. सेंटर १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना केल्या.
यावेळी स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता तथा सह मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता संजय खाबडे, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे यांच्यासह सल्लागार उपस्थित होते.
आयुक्त सिंह यांनी सेंटर तसेच, संपूर्ण इमारत व परिसराची पाहणी केली. सेंटरचे शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करावीत. त्यानंतर १०० टक्के क्षमतेने सेंटर सुरू करून नागरिकांना लाभ द्यावा, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व सल्लागारांना केली. तसेच, काही सूचना आयुक्तांनी केल्या. हा प्रकल्प ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आला आहे. सेंटरच्या पायाभूत सुविधांमध्ये डेटा सेंटर, क्लाऊड, नेटवर्क, सुरक्षा आणि शहरातील विविध सेवांशी जोडले जाण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर, नागरिक केंद्री सेवा, स्मार्ट सिटी अॅप्स आणि वेब पोर्टल, स्मार्ट सुविधा आणि माहिती देणारे डिस्प्ले ( व्हीएमडी) आदींचा समावेश आहे. पायाभूत सुविधा ऑप्टीकल फायबर, वाय फाय, वायर्ड बस, वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, लाँग टर्म इव्होल्युशन नेटवर्क उभारण्यात येत आहे. सेंटरच्या साहाय्याने स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, स्मार्ट वाहनतळ व्यवस्थापन, स्मार्ट व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन, स्मार्ट समुदायांचे व्यवस्थापन, स्मार्ट पालिका व्यवस्थापन, स्मार्ट परिवहन व्यवस्थापन इत्यादी घटकांशी संपर्क वाहतूक स्थापित करून संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जाणार आहे.















