न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह हे महापालिकेच्या विविध विभागांचा अभ्यास करीत आहेत. सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन कामात सुसूत्रता ठेवून शिस्त पाळण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच, ते सर्वच फाईली जातीने अभ्यासत असल्याने त्यावर लगेच सह्या करीत नाहीत. त्यामुळे बहुतांश विभागाच्या फाईली त्यांच्या सहीमुळे रखडल्या आहेत. परिणामी, कामांना विलंब होणार असल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
आयुक्त राजेश पाटील यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या जागी सिंह रूजू झाले. ते प्रथमच मोठ्या शहरातील महापालिकेचे कामकाज हाताळत आहेत. त्यामुळे त्यांनी आल्या आल्या सर्व विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन कामकाज समजावून घेतले. फाईलवर आयुक्तांची सही झाल्यानंतर अंतिम मंजुरी मिळाल्याचे शिक्कामोर्तब होते. मात्र, नवीन आयुक्त शेखर सिंह हे प्रत्येक फाईल बारकाईने तपासत आहेत. त्यावर अभ्यास करूनच सह्या करीत आहेत. फाईलबाबत उपस्थित झालेल्या शंकाचे निरसन करण्याबाबत ते आग्रही आहेत. अनेक फाईली सह्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अनेक अधिकाऱ्याची चिंता वाढली आहे.
कामाचा दर्जा न राखल्यास कारवाईचा इशारा…
सर्वच विभागांनी आपल्या कामाचा दर्जा राखावा. नागरिकांशी सौजन्याने वागावे, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. विशेषतः स्थापत्य विभागाच्या कामांचा दर्जा अधिक चांगला असावा. ते काम वेळेत पूर्ण केले जावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. काम करताना सुरक्षेकडेही लक्ष देण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. मनमर्जी आणि कश्याही प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच, संथ गती कामकाजामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी फैलावर घेतले होते.















