न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या शहरातील मिळकती, उद्यान व जलकुंभाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने आणखी ४७ रखवालदार मदतनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना मूळ वेतन ११ हजार ५०० आणि महागाई भत्ता ७ हजार ७० असे एकूण १८ हजार ५७० मासिक वेतन दिले जाणार आहे.
पालिकेच्या मिळकती व उद्यान व जलकुंभाच्या सुरक्षेसाठी पालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय एकूण १ हजार ३०५ रखवालदार मदतनीस कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत. कर्मचारी पुरवठ्याचे काम एम. के. फॅसिलिटीज सर्व्हिसेस, नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस, सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी आणि क्रिस्टल इंटेग्रेटेड सर्व्हिसेस या एजन्सीना देण्यात आले आहे.
मिळकती, उद्यान व जलकुंभासाठी क्षेत्रीय कार्यालय, उद्यान विभाग व पाणीपुरवठा विभागाकडून सुरक्षारक्षक मदतनीस नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार सुरक्षा विभागाने आयक्तांकडे १७ ऑगस्टला प्रस्ताव दिला होता. अ व फ क्षेत्रीय कार्यालयासाठी ३, ब व ग क्षेत्रीय कार्यालयासाठी १०, क व ई क्षेत्रीय कार्यालयासाठी १९ आणि ड व ह क्षेत्रीय कार्यालयासाठी १५ असे एकूण ४७ रखवालदार मदतनीस २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नेमले जाणार आहेत. त्या खर्चास पिंपरी – चिंचवड महापलिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. ६) मान्यता दिली आहे.















