- पालिका आस्थापनेवर सामावून घेण्याच्या ठरावास राज्य शासनाची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (एनयूएचएम) मानधनावरील स्टाफ नर्स (परिचारिका), वैद्यकीय अधिकारी, ऑपरेटर, एएनएम (आरोग्य सेविका), फार्मासिस्ट, अटेडन्ट असे एकूण १४४ कर्मचाऱ्यांना महापालिका आस्थापनेवर सामावून घेण्याच्या महापालिकेच्या ठरावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्यांचा पालिकेची कायमस्वरूपी नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका आस्थापनेवर वैद्यकीय विभागातील विविध पदे शासन मंजूर आहेत. वैद्यकीय सेवा नागरिकांच्या आरोग्याशी थेट निगडित आहे. त्यासाठी पालिकेने वैद्यकीय विभाग व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासाठी सन २००७ पासून वेळोवेळी मानधनावर विविध पदे भरलेली आहेत. त्यांना पालिकेच्या कायमस्वरुपी सेवेत घेण्याबाबत पालिका सर्वसाधारण सभेने २६ ऑगस्ट २०२० ला ठराव केला होता. पालिका शासनाने मंजुरी दिली आहे. आयुक्तांनी शासनास पाठविलेल्या प्रस्तावास शासन निर्णयामध्ये पालिका वैद्यकीय विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत १४४ कर्मचारी कार्यरत आहेत. पालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्याचा शासनावर कोणताही आर्थिक भार पडत नाही, असे आयुक्तांनी कळविले आहे. त्या कर्मचाऱ्यांचे काम महत्त्वाचे असल्याचे त्यानुसार, पालिकेच्या प्रस्तावानुसार पालिका सेवेत सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये शहर कार्यक्रम अधिकारी, शहर लेखाव्यवस्थापक प्रत्येकी एक, वैद्यकीय अधिकारी ३, फार्मासिस्ट १२, एएनएम ३८, डाटा इंट्री ऑपरेटर ८, अटेडन्ट (मदतनीस) ११ अशा एकूण १४४ कर्मचा-यांचा यामध्ये समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही अटी – शर्ती शासनाने घातल्या आहेत. त्यानुसार प्रशासकीय खर्च ३५ टक्के मर्यादा ओलांडणार नाही, याची दक्षता घ्यावी. संबंधित कर्मचाऱ्यांनी योग्य अर्हता पूर्ण करणे व विहित कार्यपद्धतीने नियुक्ती झालेली आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचा भंग होणार नाही, याची खातरजमा पालिका आयुक्तांनी करावी. निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून शासनास अहवाल पाठवावा, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.















