न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- महापालिका अग्निशामक अधिकारी महिनाअखेर सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, सेवा निवृत्तीनंतर मुदतवाढ मिळावी किंवा मानधन तत्त्वावर आणखी काही कालावधीसाठी नियुक्ती करावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास अग्निशामक दलातील ६० कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून अग्निशामक अधिकाऱ्याविरुद्ध स्वाक्षरी मोहीम राबवून आयुक्तांना निवेदन दिले आहे.
आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, अग्निशामक दलातून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यास अग्निशामक संबंधित कोणत्याही पदावर नियुक्ती करू नये. त्यांना मुदतवाढ देऊ नये. या अधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. दरम्यान, उपमुख्य व विभागीय अग्निशमन अधिकारी पदे नव्याने निर्माण केली आहेत. या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांवर अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांची पदोन्नतीने नियुक्ती करावी. ती न केल्यास या कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल. तसेच, अग्निशमन विमोचक अर्थात फायरमन संवर्गातील पद भरतीही करावी.
सद्यःस्थितीत ३९ फायरमन व सात अग्निशमन केंद्र कार्यरत आहेत. आठ तासांच्या शिफ्टनुसार फायरमनची नियुक्ती केली जाते. एका शिफ्टमध्ये सहा कर्मचारी कामावर असणे आवश्यक आहे. त्यानुसार तीन शिफ्टसाठी एका केंद्रावर १८ म्हणजेच सात केंद्रावर १२६ फायरमन असणे आवश्यक आहे. मात्र सद्यःस्थितीत केवळ ३९ फायरमन कार्यरत असून एका शिफ्टमध्ये एका केंद्वावर केवळ एक किंवा दोन कर्मचारीच असतात. त्यामुळे फायरमन पदांची भरती करण्याचीही आवश्यकता आहे.


















