न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. त्याला महापालिका सभेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच मान्यता दिली.
महापालिकेच्या शाळांसाठी दरवर्षी रंगरंगोटी, दुरुस्ती काम, शाळेची स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे वेतन आदींवर वारेमाप खर्च केला जात आहे. महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या १८ शाळा आहेत. प्राथमिक विभागाच्या ११० शाळा आणि २०७ बालवाड्या असे एकूण ३१७ शाळा आहेत. या सर्व शाळांसाठी बोधचिन्ह, घोषवाक्य नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावण्यात येणार आहे.
शाळेजवळील रस्त्यावर ‘ पीसीएमसी पब्लिक स्कूल ‘ असे नामफलक लावण्यात येणार आहेत. ‘ ज्ञानमेव शक्ती ‘ हे घोषवाक्य असणार आहे. सर्व शाळेशेजारच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, मुला – मुलींचे शौचालय असे एकाच आकाराचे व एकाच रंगसंगतीचे विविध चिन्हांचे फलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे. त्याला महापालिका आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली.