- हौसिंग फेडरेशनपुढे ओल्या कचऱ्याचा पेच कायम; ते घंटागाडी कर्मचारीही रडारवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२२) :- येत्या २ ऑक्टोबरपासून मोठ्या सोसायट्यांचा ओला कचरा न उचलण्याची घोषणा महापालिकेने केली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक झाली. या बैठकीतही मोठ्या सोसायट्यांचा ओला कचरा उचलणार नाहीच, अशी भूमिका महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मांडली. ज्या सोसायट्यांमध्ये ७५ पेक्षा जादा फ्लॅटधारक आहेत किंवा ज्यांचा ओला कचरा १०० किलोपेक्षा अधिक असतो, अशा सोसायट्यांचा कचरा २ ऑक्टोबरपासून उचलणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतली आहे.
महापालिकेच्या या निर्णयाला पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशनने तीव्र विरोध केला. आपली भूमिका मांडण्यासाठी फेडरेशनचे पदाधिकारी आणि आयुक्त शेखर सिंह यांच्यात सोमवारी महापालिका भवनात बैठक झाली.यावेळी सचिन लोंढे, सुधीर देशमुख, दत्तात्रय देशमुख, रोहित सावंत आदी सोसायटी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत फेडरेशनचे पदाधिकारी यांनी पाणी, रस्ते, वीज, कचरा, अतिक्रमण याबाबत सोसायटींच्या समोरील समस्याचा पाढा वाचला. मात्र, इतर बाबी वेगळ्या असून, त्याबाबत स्वतंत्र चर्चा करू. मात्र, ओला कचरा महापालिका उचलणार नाही हा केंद्र शासनाचा आदेश असून आम्ही त्याचे पालन करीत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कचरा जमा करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडी बरोबर असणाऱ्या कोणालाही एक पैसाही देण्याची गरज नाही. कोणी पैसे घेऊन सोसायटीतील कचरा जमा करीत असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. हे प्रकार टाळण्यासाठी लवकरच कंत्राटदारांशी बैठक घेणार आहे. त्यानंतरही असे प्रकार झाले तर संबंधित कंत्राटदारांवर कडक कारवाई करू.
२०१६ नंतरच्या सोसायट्यांसाठी १०० किलो ओला कचरा जमा होत असेल तर त्यांना कंपोस्टिंग युनिट असणे बंधनकारक आहे. जागा नसेल त्या सोसायट्यांबाबत वेगळी यंत्रणा राबविण्यात येईल. त्यासाठी मात्र किंमत मोजावी लागेल. कचरा संकलनासाठी पैसे कमी आकारण्यासाठी महापालिका हस्तक्षेप करेल. सोसायटींनी पैसे देऊ नयेत.
जीपीएसनुसार कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्यांना ठरवून दिलेल्या मार्गावर ठरवून दिलेल्या वेळी जाणे आवश्यक आहे. यापुढे घंटागाड्यांच्या जीपीएस ट्रॅक करूनच संबंधित कंत्राटदारांचे बील काढले जाईल, असा इशाराही यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.