न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावरील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी भरती करण्यात आली नाही. भरतीअभावी तीन क्षेत्रीय कार्यालयात ही पदे रिक्त आहेत. यामुळे मुख्य आरोग्य निरीक्षकांवर सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाचा अधिकचा भार देण्यात आला आहे.
महापालिकेच्या या विभागामार्फत साफसफाई करणे, औषध व धुर फवारणी करणे आदी कामे केली जातात. प्रभागांमध्ये त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी सहाय्यक आरोग्य अधिका-यांवर असते. क्षेत्रीय कार्यालयातील तीन सहाय्यक आरोग्य अधिकारी निवृत्त झाले आहेत. मात्र त्या जागेवर अद्याप नवीन भरती करण्यात आली नाही.
गेल्या एका वर्षांपासून सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाची रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे अ, ड आणि फ क्षेत्रीय कार्यालयाला सध्या पुर्ण वेळ अधिकारी मिळेनासा झाला आहे. मुख्य आरोग्य निरीक्षकांवर त्या पदाचा भार देण्यात आला आहे. परिणामी परिसरातील आरोग्याचे प्रश्न कधी सुटणार असा सवाल उपस्थित होत आहे.
सहाय्यक आरोग्य अधिकारी पदासाठी आरोग्य निरिक्षक कोर्स उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. मुख्य आरोग्य निरिक्षक म्हणून तीन वर्षे काम केल्यानंतर सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर नियुक्ती दिली जाते. सध्या पात्रता धारण केलेले नसल्यामुळे रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. परिणामी इतरांवर जबाबदारी दिल्याने आरोग्याबाबत निर्णय घेणे अडचणीचे ठरत आहे.















