न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- आळंदी नगरपरिषदेत हद्दीलगतच्या आठ गावांना समाविष्ट करण्याचा ठराव प्रशासनाने केला असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते निलेश कड यांनी शासनास दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने खेड तालुक्यातील आळंदी लगतचे केळगाव, सोळू ,धानोरे, मरकळ, गोलेगाव, चऱ्होली खुर्द व आळंदी ग्रामीण अशा आठ गावांचा समावेश करण्याबाबत विनंती केली आहे. या अनुषंगाने वस्तुस्थिती अहवालासह सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार समाविष्ट गावांची लोकसंख्या सोळू (२,८८३), धानोरे (२,५६७), केळगाव (३,४९१), चऱ्होली खुर्द (३,७३४), आळंदी ग्रामीण (३,७६३), मरकळ (६,३७८), पिंपळगाव (१,००२), गोलेगांव (१,७५१) अशी एकूण लोकसंख्या २५,५६९ आहे. तसेच आळंदीतील २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या २८,६४५ इतकी आहे. यामध्ये अनुसूची ‘ अ ‘ मध्ये महसुली गावांची नावे व गावांचा गट नंबर असणारी माहिती या सूचीमध्ये आहे. अनुसूची ‘ ब ‘ आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये समावेशानंतर होणाऱ्या एकात्मिक निर्माण भौगोलिक सीमांचा उल्लेख असणारी माहिती या सूचीमध्ये आहे. ‘ क ‘ सूचीमध्ये आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये सर्व महसुली गावाचा पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन व इतर स्वरूपाची माहिती आहे.















