न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांनी उत्सव साजरा होणार असल्याने भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन दर्शनाची सुविधाही असणार आहे, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर देवस्थानचे धनंजय काळभोर यांनी दिली.
मंदिरात सोमवारी (दि. २६ ) सकाळी दहा वाजता घटस्थापना होणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होईल. उत्सवकाळात रोज देवीची विविध स्वरूपात पूजा बांधण्यात येईल. मंदिरात संपूर्ण नवरात्र काळात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील. रोज सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
ललित पंचमीला श्रीसुक्त पठण असेल त्यात महिलांचा मोठा सहभाग असेल तर अष्टमीला सकाळी ११ वाजता होमहवन होईल. दोन वर्षांनी उत्सव साजरा होणार असल्याने नागरिकांची गर्दी वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी दर्शनवारी व त्यांच्या सोयीसाठी इतर सुविधा आहे.
















