न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.
नवरात्र उत्सव आज सोमवारपासून (दि. २६) साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी ४ रुपये ७१ पैसे प्रति युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ५०० प्रति युनिट वीज वापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तक्रारीसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १ ९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.