न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. आयुक्तांनी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अखेर गुरुवारी (दि. २२) बैठक घेतली. यावेळी शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सप्टेंबर संपत आला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नव्हता, परिणामी, एका महिन्यापासून शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात बदली प्रसिद्ध होत नव्हती.
२०१८ पासून तत्कालीन आयुक्तांनी परिपत्रक काढून प्रशासकीय बदली प्रक्रिया कशी राबवावी, याचा निर्णय दिलेला आहे. पण प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून निव्वळ बदल्यांसंदर्भात परिपत्रक काढले जात आहेत. कुठल्याही प्रकारची प्रत्यक्षात यावर कार्यवाही झालेली नाही. शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया राबवली जात नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या २९ शाळा मुख्याध्यापकांविना आहेत. त्यांनाही मुख्याध्यापक मिळत नसल्याचे चित्र आहे. तीन वर्षाच्या निकषांनुसार केवळ ३० टक्के बदलीपात्र शिक्षकांची संख्या ३०० हून अधिक आहे. प्रशासनाने या शिक्षकांची यादी तयार करणे आवश्यक आहे.
अनेक शाळांमध्ये तीन, पाच व १५ वर्षे झालेल्या शिक्षकांची मक्तेदारी वाढलेली आहे. बायोमेट्रिक हजेरी लावतात आणि गायब होतात. त्याचा थेट परिणाम शाळेच्या गुणवतेवर झाला आहे. शिक्षक बदलल्याशिवाय शाळा सुधारणार नाहीत, असा पूर्वानुभव आहे; परंतु, तीन वर्षापासून बदल्या होत नसल्याने काही शिक्षकांचे चांगलेच फावले आहे. या निकषानुसार तरी बदल्या करायला हव्यात, अशी मागणी शिक्षक करू लागले आहे.
शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने व्हाव्यात ही आमची मागणी बैठकीत आयुक्तांनी मान्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन होणार आहेत.
– बबन झिंजुर्डे, अध्यक्ष, पिपरी- चिचवड महापालिका कर्मचारी महासंघ…