न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- देहू नगरपंचायत हद्दीत नव्याने बांधकाम करणाऱ्या बांधकामधारकांनी नगरपंचायतीचे नियम, अटींचे पालन करून बांधकाम करावे. कायदेशीर आराखडा (नकाशा) मंजूर केल्याशिवाय नवीन बांधकामे करू नयेत. अन्यथा बेकायदेशीर, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पूर्वी ग्रामपंचायत हद्दीमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मंजूर आराखड्यान्वये बांधकामे नोंदविली जात होती. अनेक बांधकामे ही बेकादेशीर नोंदविली जात होती. मात्र, देहु नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर शासकीय आणि नगरपंचायतीच्या नियमानुसार बांधकामांनाच परवानगी दिली जाते. अशा बांधकामांवर शास्ती कर आकारला जात नाही. बेकायदेशीर, अनधिकृत बांधकाम घोषित करीत ती पाडण्यात येतात.
परवानगी घेण्याचे आवाहन…
नवीन बांधकाम करताना अटी, शर्ती नियमानुसार परवानगी घ्यावी. परवानगी घेतल्याशिवाय कोणीही बांधकामे करू नये. विनापरवाना सुरू करण्यात येणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेकायदेशीर बांधकामांमुळे अडचणी…
बेकायदेशीर बांधकामांमुळे निर्माण होणारे गल्लीबोळ, अरुंद रस्ते विविध विकासकामांना अडथळे निर्माण होतात. तसेच मर्यादित चटई क्षेत्रापेक्षा जास्त केल्या जाणाऱ्या बांधकामामुळे धोके व दुर्घटना घडू शकतात. तसेच पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी आणि एखादी दुर्घटना घडल्यास घटनास्थळावर तातडीने अग्निशमन वाहन अथवा रुग्णवाहिका पोहोचविण्यासाठी सुसज्ज रस्ते, विविध विकासकामे करण्यासाठी नियोजनबद्ध बांधकामे होणे गरजेचे आहे.















