न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिरात आज सकाळी विधिवत घटस्थापना करण्यात आली. पहाटे देवीचा अभिषेक व आरती करत घटाची माळ लावण्यात आली.
देवीचा पहाटेचा अभिषेक लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने व वेहेरगावच्या सरपंच अर्चना संदीप देवकर यांच्या हस्ते करण्यात आला.तर घट बसविण्यासाठी देवीचे गुरव (देशमुख परिवार) व पुजारी (गोविलकर, खिरे) तसेच मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते घटाची माळ लावण्यात आली.
मागील दोन वर्ष कोरोनामुळे देवीचा नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र घट बसविण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी गडावर गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने कार्ला गड दुमदुमला होता.देवीचे मंदिर व चौघड्यांला आकर्षक फुलांचे डेकोरेशन करण्यात आले असून गड परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


















