- यापुढे विषयांची सखोल माहिती हवी; तरच उठणार आयुक्तांची मोहोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- स्थायी समितीमध्ये सविस्तर विषयांची माहिती न देणे, महापालिकेच्या अधिका-यांना चांगलेच भोवले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नावर गोल गोल उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. योग्य आणि आकडेवारीसह उत्तर द्या, असे आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याला सुनावले. महापालिकेची स्थायी समितीची बैठक मंगळवारी (दि. २७) पार पडली. या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त राजेश पाटील स्वच्छ भारत मोहिमेबाबत माहिती घेत होते. त्यावेळी जल:निसारण अधिकाऱ्यांना शहरामधील किती शौचालये ड्रेनेज लाइनला जोडली आहेत? याबाबत माहिती विचारली त्यावर मुद्देसहीत उत्तर न देता संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
या गोल – गोल उत्तरांमुळे आयुक्त पाटील संबंधित अधिकाऱ्यांवर चांगलेच बरसले. योग्य मुद्दे व आकडेवारीसहीत माहिती न देता इतर माहिती सांगत असल्याने आयुक्तांचाही पारा चढला. स्थायी समितीमध्ये सादर केलेल्या विषयांबाबत सविस्तर माहिती देत नसल्याने विभाग प्रमुखांवर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यासाठी योग्य आराखडा तयार करण्याची सूचनादेखील नगर सचिवांना देण्यात आली आहे.
अनेक प्रस्तावांमध्ये विषयांची माहिती दोन ते तीन ओळींमध्ये असते. खरेदी नेमकी कशासाठी करायची आहे? त्यासाठी ठेकेदार कोण? त्यांनी सादर केलेला दर निविदेच्या किती कमी – जास्त आहे? याबाबतची काहीच माहिती नसल्याने संबंधित विषयांबाबत सखोल माहिती मिळत नाही. त्यामुळे चुकीचे विषयदेखील मंजूर होण्याची शक्यता असल्याचे आयुक्तांनी विभागप्रमुखांना सांगितले. त्यामुळे प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती निश्चित केलेल्या आराखड्यामध्ये आणा, अशी सूचना आयुक्त सिंह यांनी विभाग प्रमुखांना केली.
मुदतवाढ दिली होती का ? दर काय होते ? याबाबतची सविस्तर माहिती असेल तरच विषय आणा, असे आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये २१ विषय होते. त्यापैकी १३ विषय मंजूर करण्यात आले आहे. तर ८ विषयांची सविस्तर माहिती नसल्याने आयुक्त सिंह यांनी ते विषय फेटाळले. त्या विषयांबाबत पुढील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सविस्तर माहिती देण्याची सूचना आयुक्त सिंह यांनी केली.