न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- यंदाच्या नवरात्रौत्सवात शेवटच्या चार दिवसांपैकी तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबा रंगणार आहे. राज्य सरकारने १ ऑक्टोबर तसेच ३ आणि ४ ऑक्टोबर असे तीन दिवस उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरास सूट दिली आहे.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करून सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चर्चा करून मुंबईत १ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदाचा नवरात्रौत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे गुजरातच्या धर्तीवर राज्यातही गरबा खेळण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यात सूट देण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार सरकारने निर्णय घेतला आहे.