न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ इ ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रस्त्यांवरील पथारीवाल्यांवरील कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली आहे. रस्त्यावर अनधिकृतरीत्या हातगाड्या, टेम्पो तसेच लोखंडी स्टैंड लावून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे ‘ इ ‘ क्षेत्रीय कार्यालयातील आधिकाऱ्यांनी सांगितले.
‘ इ ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने भोसरी आळंदी रोड, भोसरी दिघी रोड, दिघी मॅक्झीन चौक, चऱ्होली व मोशी या भागामध्ये कारवाई करण्यात आली. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कडेला पथारी व्यावसायिकांनी परवानगी न घेता व्यवसाय सुरू केले आहे. त्यामध्ये खाद्यपदार्थ, मोबाइल अॅक्सेसरीज, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या दुकानांचा समावेश आहे.
हातगाड्या व पथारीवाले रस्त्याच्या कडेला बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होत होता. तसेच यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत ‘ इ ‘ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यापुढेही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त राजेश आगळे यांनी दिली.