- पिंपळे सौदागरमध्ये ‘ भव्य दांडिया महोत्सव २०२२ ‘ चे आयोजन..
- सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई काटे, उद्योजक संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचाचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी पिंपळे सौदागर नगरीत दांडियाचा नाद घुमणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई काटे, उद्योजक संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने शुक्रवारी (दि. ३०) ते रविवार (दि. २) या दरम्यान ‘ भव्य दांडिया महोत्सव २०२२ ‘ चे आयोजन करण्यात आले आहे.
येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या मैदानात त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमासाठी माजी महापौर आणि कलाकारांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच दररोज विविध प्रकारचे बक्षीसही लुटण्याची संधी महोत्सवात सहभागी स्पर्धकांना मिळणार आहे.
याबाबत माहिती देताना अनिताताई काटे म्हणाल्या, कोरोना महामारीचा काळाकुट्ट काळ आता मागे सरला आहे. हिंदू सणांचा सुवर्णकाळ सुरु झाला आहे. पिंपळे सौदागर मधील सोसायटीतील नागरिकांसाठी नवरात्रीनिमित्त सलग तीन दिवस ‘ भव्य दांडिया महोत्सव २०२२ ‘ आयोजित केला आहे. त्यात गुजराती पारंपरिक गरबा व लोकगीते यांच्यासोबत आधुनिक साऊंड ट्रॅकवर बसवलेले दांडिया नृत्य, सोबतच खास आकर्षण सारेगमपा सिंगर मयुरेश वाघ यांच्या गायनावर तरुणाई थिरकणार आहे. सहभागी प्रत्येकाला बक्षीस जिंकण्याची संधी आहे. त्यात उत्कृष्ठ कपल, उत्कृष्ठ नृत्य (पुरुष), उत्कृष्ठ नृत्य (महिला), उत्कृष्ठ वेशभूषा (पुरुष), उत्कृष्ठ वेशभूषा (महिला), उत्कृष्ठ बाल नृत्य (मुलगा), उत्कृष्ठ बाल नृत्य (मुलगी), उत्कृष्ठ बाल वेशभूषा (मुलगा / मुलगी) यांच्यातील सर्वोत्कृष्ठ स्पर्धकाची बक्षीसासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील सोसायटी वर्गाने या दांडिया महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अनिताताई काटे यांनी केले आहे.