- बांधकाम कामगारांना महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून सुरक्षा कवच
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :- सुरक्षा साधनां अभावी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातामुळे बांधकाम कामगारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेने पुढाकार घेतला आहे. १२५० बांधकाम कामगारांना आज (शनिवारी) सेफ्टी किटचे वाटप करत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देखील देण्यात आला.
महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे भोसरीतील क्वालिटी सर्कल सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे उपशहर प्रमुख आबा लांडगे, युवराज कोकाटे, संघटनेचे उपाध्यक्ष किसन बावकर, भिवाजी वाटेकर, युवा सेनेचे परशुराम आल्हाट, सचिन सानप, मारुती कौदरे, आबा मांढरे, रवी घोडेकर, प्रदीप धामणकर, बांधकाम विभागाच्या जिल्हा अध्यक्षा उज्ज्वला गर्जे, प्रितेश शिंदे, महेश हुलावाले आदी उपस्थित होते.
यावेळी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यात शंकर फुलारी यास साठ हजार रुपये, निशा इंगळे हिला दहा हजार रुपये, प्रेरणा इंगळे हिला अकरा हजार आणि अभिषेक येळे यास वीस हजार आणि सुजाता पुजारी हिला अडीच हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
इरफान सय्यद म्हणाले, ”शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. या स्मार्ट सिटीचा दर्जा उंचविण्याचे काम असंघटीत बांधकाम कामगार करत आहेत. कामगार सर्वांना घरे बांधून देत आहेत. इमारती बांधून देत आहेत. परंतु, याच कामगारांना हक्काचे घर नव्हते. कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी नुकतीच कामगारांना स्वत:चे घर देण्याची घोषणा केली आहे. शहरी भागातील कामगाराला घरासाठी साडेचार लाखाचा तर ग्रामीण भागातील कामगाराला दीड लाखाचा निधी भेटणार आहे. तसेच कामगारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून, त्यासाठी बांधकाम कामगारांच्या सदैव पाठिशी राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शासनाच्या विविध योजनेचा लाभ असंघटीत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मिळावा म्हणून कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पाच हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत जवळजवळ हजारो कामगारांना संघटीत करण्याचे काम महाराष्ट्र मजदूर संघटनेने केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत असताना शासन दरबारी मागण्या मांडणार असल्याचे इरफान सय्यद यांनी सांगितले”.
सुरक्षा किटमध्ये कामगारांना प्रोटेक्टिव्ह शुज, मास्क, इअरिंग, हेल्मेट, सेफ्टी हॅंड हॉनेश, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, तसेच प्लॅस्टिक चडई, सोलर टॉर्च, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, खांद्यावरील बॅग, पत्र्याची पेटी अशा सुमारे अकरा हजार रुपये किंमतीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येकी कामगारांना पाच हजार रुपये व सुरक्षा रक्षक संच देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश वनवटे, चंदन वाघमारे, अनिल खपके, साई धोत्रे, ओंकार माने, समर्थ नाइकवडे यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र मजदूर संघटनेने नाक्यावरच्या कामगाराला सर्वांत जास्त पैसे मिळवून दिले आहेत. आणखीन पाच हजार कामगारांची नोंदणी चालू आहे. त्यांनाही लाभ मिळवून दिले जातील. घर देत आहात, ही आनंदाची बाब आहे. परंतु, हक्काचा कामगार नाका देण्यात यावा. लवकरात लवकर नाका द्यावा. अन्यथा सर्वात मोठा मोर्चा महापालिकेवर काढला जाईल, असा इशारा इरफान सय्यद यांनी दिला. बांधकाम कामगार संघटीत झाल्याने अठरापगड जातीचे बलुतेदार ही एकत्रित आले आहे. सरकारची कामगारांविषयी भूमिका ही हिताची जरी नसली, तरी शासनाच्या विविध योजनांमुळे मजुराला हक्क प्राप्त होणार आहे. शासन योजनांचा लाभ व अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यादृष्टीने आपण शासन दरबारी जाऊन पाठपुरावा करु ग्वाही त्यांनी दिली. – इरफान सय्यद











