- हवेत कोयता फिरवून जमावावर दहशत; एकजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- चिखलीतील ताम्हाणे वस्ती परिसरात दहशत माजवुन आरोपींनी एका जणावर कोयत्याने वार केला. तसेच त्याच्या मुलास शिवीगाळ व लाथाबुक्कयांनी मारहाण करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. ४) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास भिमशक्तीनगर, ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.
त्यानुसार चंद्रकांत साहेबराव माने (वय ४० वर्ष, रा. गट नं १५०८, दुसरा मजला, टॉवर लाईन जवळ, ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी किरण साळवे (पुर्णनाव पता माहीत नाही), शुभम काळभोर (पुर्ण नाव पता माहीत नाही), अमोल दराडे (पुर्णनाव पता माहीत नाही) यांच्यावर पोलिसांनी ५२२/२०२२ भा.द.वि. कलम ३०७,५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट ४ (२५), सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमिनल अमेंटमेड अॅक्ट कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी किरण साळवे याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी अशी माहिती दिली की, फिर्यादी घरी असताना आरोपी फिर्यादीच्या घरात घुसले. फिर्यादी यांना धक्का देत आरोपी किरण याने सुमारे २० दिवसापुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी व त्यांचा मुलगा याच्यावर चिडुन जावुन शिवीगाळ केली. त्याने त्याच्या पॅन्टमध्ये लपविलेला कोयता काढुन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. परंतु, फिर्यादी हे खाली वाकल्याने तो वार हुकला. परंतु, आरोपीच्या हातामधील कडे फिर्यादी यांच्या डोक्यास लागुन गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जोराचा आरडाओरडा ऐकुन आसपासचे लोक जमा होऊ लागले. त्यावेळी आरोपी शुभम याने त्याच्या हातातील कोयता लोकांकडे दाखवुन ” तुम्ही मला ओळखत नाही का? मी इथला” भाई आहे, असे बोलून हवेमध्ये कोयता फिरवुन आरडाओरडा केला. जमलेल्या लोकांनी घाबरुन घरामध्ये जाऊन दारे-खिडक्या बंद केल्या. आरोपींचे लक्ष बाहेरील जमलेल्या लोकांकडे असल्याच्या संधीचा फायदा घेत फिर्यादीने आरोपींना धक्का देत स्वतःची सुटका करून घेतली. घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.