- रिक्षा व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- रिक्षा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आरोपींनी तरुणाकडे पंधरा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. त्याला विरोध केला असता, तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. ” तु जर हप्ता चालु केला नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही, तुझी गेम करतो ”, अशी धमकी देत आरोपींनी कारमधून पोबारा केला.
ही घटना मंगळवारी (दि. ४) रोजी ३:३० च्या सुमारास खेडमधील महाळुंगे इंगळे परिसरातील भैरवनाथ मंदीरासमोरील, मोफत वाचनालयाजवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी सुरज गणपत कदम (वय २९ वर्ष, रा. जावळे वस्ती, महाळुंगे इंगळे, ता-खेड, जि पुणे) यांनी चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार योगेश विलास बोत्रे (रा. खालुंब्रे, ता. खेड जि पुणे), राहुल बाळासाहेब फलके (रा. महाळुंगे ता. खेड, जि पुणे), योगेश बोत्रे याचा मित्र (नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या तीन रिक्षा आहेत. रिक्षा व्यवसाय चालु ठेवण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडे महिन्याला पंधरा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिल्याने आरोपी योगेश आणि राहुल यांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी तोंडावर, पोटात, पाठीवर मारहाण करुन गंभीर दुखापत केली. आरोपी योगेश याने फिर्यादीच्या शर्टच्या खिश्यातील दोन हजारांची रक्कम काढुन घेतली. तसेच गाडीच्या ड्रायव्हींग सिटवर बसुन फिर्यादीला लोखंडी कोयता दाखवुन, ” तुला माज आला आहे, तुझी गेम करायला आम्हाला वेळ लागणार नाही, मारा हरामखोराला, आपल्याला नाही बोलतो काय त्याला धडा शिकवा ”, असे इतर आरोपींना ओरडुन सांगितले. फिर्यादीच्या तोंडातुन रक्त आल्याचे दिसताच, आरोपी योगेश याने फिर्यादीस, ” तु जर हप्ता चालु केला नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही, तुझी गेम करतो ”, अशी धमकी देत इतर आरोपींसह पळून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.