न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२२) :- वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे, यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महावितरणची थकबाकी वाढलेली असून थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. थकबाकीदार ग्राहकांचा थकबाकीपोटी वीज खंडित करण्यात येत आहे. चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे, म्हणून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरू असणार आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीज ग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom. in ही वेबसाईट तसेच मोबाइल अॅपद्वारे ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. तर, लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.
















