- विविध साहित्य प्रकारातून मराठी समुध्द झाली….. प्राचार्य डॉ. हरिष तिवारी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मार्च) :- मराठी भाषेत असणारे साहित्यांचे विविध प्रकार जगातील इतर भाषेमध्ये नाहीत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेलच परंतू त्याआधी साहित्यातील विविध प्रकारांमुळे मराठी जगातील पाचही खंडांमध्ये पोहचलेली देशातील एकमेव प्रादेशिक भाषा आहे. दरवर्षी जागतिक पातळीवर साहित्य संमेलन फक्त मराठी भाषेचे भरविले जाते. कथा, कविता, कादबंरी, नाट्य, संगित नाट्य, ललित, व्यंगचित्र, स्फूट, चारोळ्या, गझल, भारुड, लावणी, तमाशा, पिंगळा, वासूदेव, गोसावी, गोंधळी, पोतराज, चित्रपट, ग्रामिण – शहरी अशा विविध साहित्य प्रकारातून मराठी समुध्द झाली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. अशी माहिती पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी दिली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे गुरुवारी (दि. २८) मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रा. मानसी कुरकुरे, प्रा. सोनाली लूणावत, प्रा. मैथीली अंधारे, प्रा. तुषार गायकवाड, प्रा. राहुल वावने, प्रा. निधी खरे आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी ‘ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताचे सामुहिक गायन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि ग. दि. माडगुळकर यांच्या साहित्यांचे वाचन करण्यात आले.











