न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या युवक व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कजांची मर्यादा १० लाखांवरुन थेट १५ लाख केली आहे. विशेष म्हणजे या कर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत भरण्यात येणार आहे. मराठा समाजातील युवकांना ही संधी उपलब्ध आहे. ही योजना महामंडळामार्फत पुण्यासह प्रत्येक जिल्ह्यात राबविली जाते.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : लॉकडाऊन नंतर २० मे २०२२ पासून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा १० लाखांवरून २५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे. या अंतर्गत महामंडळातर्फे व्याज परतावा ४.५० लाखांपर्यंत करण्यात येणार आहे. या योजनेत उद्योग उभारणी, नवीन व्यवसाय सुरु करणे, अशा विविध कारणांसाठीकडून कर्ज उपलब्ध झाल्यानंतर महामंडळ त्याचे व्याज भरते. वय जास्तीत जास्त ६० वर्षे, वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत असावे, लाभार्थ्यांनी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
गट कर्ज व्याज परतावा योजना : यासाठी मर्यादा २५ लाख, तीन व्यक्तींसाठी ३५ लाख, चार व्यक्तींसाठी ४५ लाख आणि पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास ५० लाखांच्या मर्यादावरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करील. या योजनेंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी. कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर सरकार नोंदणीकृत गट, संस्था लाभास पात्र असतील.
गट प्रकल्प कर्ज योजना: एकूण प्रकल्प रकमेच्या १० टक्के रक्कम गटाने जमा करणे बंधनकारक, उर्वरित ९० टक्के रक्कम (दहा लाखांच्या मर्यादित) महामंडळ कर्ज देईल. प्रकल्पाची किंमत ११ लाखापेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम इतर स्रोतातून जमा करावी लागेल. निकष: या योजनेंतर्गत एफपीओ गटांची संख्या २० पेक्षा जास्त असल्यास संबंधित गटाच्या संचालकाने सर्व सदस्यांच्या उत्पन्नाचे पुरावे देणे अनिवार्य आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची ही योजना ऑनलाइन आहे. त्यासाठी संस्था किंवा व्यक्ती दलाल स्वरूपात नियुक्त केलेली नाही. योजनेबाबत माहिती हवी असल्यास जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी,
– संकेत लोहार, पुणे विभागीय प्रमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ…


















