- शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा धक्का…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- महाविकास आघाडीचे सरकार असताना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली होती. मात्र, सत्ताबदलानंतर शिंदे गट-भाजपने ही प्रभाग रचना रद्द केली. आता पुन्हा त्यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिकेमध्ये ११ नगरसेवक वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नगरसेवकांची संख्या १२८ वरून १३९ वर जाणार होती. तीन सदस्यीय पद्धतीने ४६ प्रभाग होणार होते. नियोजित असलेल्या १३९ नगरसेवकांपैकी ६९ पुरुष तर ७० महिला नगरसेविका अशी वर्गवारी झाली होती. त्यानुसार, सर्वसाधारण वर्गासाठी ७७, ओबीसीसाठी ३७, अनुसूचित जमाती (एसटी) साठी ३ तर, अनुसूचित जाती (एससी) साठी २२ जागा राखीव होत्या. मात्र, शिंदे गट व भाजप यांचे सरकार आल्यानंतर ही रचना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
नव्याने आदेशात किती सदस्य पद्धतीने प्रभाग रचना करायची याचा स्पष्ट उल्लेख नाही, भाजपसाठी चार सदस्यीय पद्धतीने केलेली प्रभाग रचना अनुकूल असल्याने २०१७ प्रमाणेच निवडणुकीची शक्यता आहे. नव्याने आदेश आल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर महाविकास आघाडीसाठी निवडणूक कठीण होणार आहे.
राष्ट्रवादीचा डाव फसला?
निवडणुकीसाठी प्रभागरचना करताना भोसरी गावठाण, चिंचवडगाव, पिंपळे सौदागर, वाकड या भागातील भाजपमधीलच अनेक स्थानिक व भावकीतले एकाच प्रभागात आणण्याची किमया तीन सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये साधली होती. मात्र, ही प्रभागरचना रद्द झाल्याने राष्ट्रवादीने टाकलेला डाव फसला आहे.
३० लाखांचा खर्च वाया
निवडणुकीसाठी १० कोटीची तरतूद केली होती. त्यात अंतिम मतदार याद्यांच्या छपाईसाठी २७ लाख, मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यासाठी १ लाख ६० हजार रुपये, हरकतींसाठी २ लाख असा एकूण ३० लाखांचा खर्च नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश आल्याने वाया गेला आहे.
















