- रुग्णालयाच्या आवारातच सूचनेचा फलकही दर्शनी भागात लावा – एफडीए..
- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीकडून निर्णयाचे स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- औषधे व सौन्दर्य प्रसाधन कायदा १९४० अन्वये रुग्णांचे नातेवाईक व कुटुंबियांना कुठल्याही मेडिकलमधून औषधे विकत घेता येणार आहेत. असा स्पष्ट आदेशच अन्न व औषध प्रसाधन विभागाचे राज्य आयुक्त अभिमन्यू काळे यांनी (दि. ९) रोजी काढला आहे. त्याचा जावक क्रमांक औ.वि./रुग्णालय/१६६ – २२/१५ असा आदेश क्रमांक आहे.
कोरोना काळात व त्यानंतरच्या काळातही रुग्णांच्या नातेवाईक व परिचित सदस्यांना रुग्णालयात असलेल्या मेडिकल स्टोअरमध्येच औषधे विकत घ्यावी लागत होती. तशी सक्तीचं अनेक ठिकाणी अनुभवास येत होती. मोठ्या प्रमाणात तक्रारी औषध विभागास प्राप्त होत होत्या, त्याची दखल आता अन्न व औषध विभागाने म्हणजेच एफडीएने घेतलेली आहे.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” कोरोना काळापासून राज्यातील अनेक कुटुंबे सतत रुग्णालयाच्या चक्रात अडकलेले आहेत. त्यातच रुग्णालयातील औषध विक्रेत्यांकडूनच औषधे विकत घ्यावी लागत असल्याने खिश्याला अतिरिक्त झळ बसत होती. स्वस्त दरात मिळणारी जेनेरिक औषधं त्यामुळे विकत घेता येत नव्हती. आता अन्न व औषधे विभागाच्या आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या ह्या आदेशामुळे नागरिकांना रुग्णालयाच्या बाहेरूनही परवाना धारक औषध विक्रेत्यांकडून औषधे विकत घेता येईल. शिवाय आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रमाणसुद्धा कमी होईल. रुग्णालयाच्या परिसरात विक्री करत असणाऱ्या विक्रेत्यांना संबंधित रुग्णालय प्रशासनाने तात्काळ सदर आदेशाचे पालन करून दर्शनी भागात या सूचनेचा फलक लावण्यास बंधनकारक करावे.”
















