न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिंचवड येथील ३१२ कोटी खर्चाची १८ मजली नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारतीसाठी ८.१९ टक्के कमी दराची केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेड या ठेकेदार कंपनीची निविदा पात्र ठरली आहे. या कामास २८६ कोटी ४ लाख ३२ हजार ८३० रुपये खर्च अपेक्षित आहे. ती कंपनी या इमारतीचे बांधकाम करणार आहे.
चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील मोकळ्या जागेत ही पर्यावरणपूरक इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलाजी प्रा. लि., केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेड, केपीसी प्रोजेक्टस लिमिटेड आणि रामा सिव्हील इंडिया कॅन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ५ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यातील केएमव्ही व शिर्के यांची निविदा पात्र ठरली. केएमव्हीने ८.१९ आणि शिर्केने ०.५० टक्के कमी दराची निविदा सादर केली होती. लघुत्तम असलेली केएमव्हीची निविदा पात्र ठरली आहे. त्या कंपनीस दर कमी करण्यासाठी पत्र दिले आहे. त्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. त्यात आणखी खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर कागदपत्रे व तांत्रिक बाजू तपासून आयुक्तांची तसेच, स्थायी समितीची मान्यता घेतल्यानंतर वर्क ऑर्डर दिली जाईल. त्यात दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यापुढे प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल. कामाची मुदत अडीच वर्षे आहे, असे कार्यकारी अभियंता देवना गट्टूवार यांनी सांगीतले
पालिकेची पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर पिंपरी येथे चार मजली मुख्य इमारत आहे. इमारतीस ३५ वर्षे झाले आहेत. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन १९८१ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २ लाख ४९ हजार ३६४ होती. आता ती २७ लाखांच्या पुढे गेली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पालिकेवर नागरी सेवा व सुविधा पुरविण्याचा ताण पडत आहे. तसेच, पालिका इमारत कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने अनेक विभागाचे कार्यालये इतर ठिकाणी आहेत. पालिकेची एकाच ठिकाणी सुसज्ज इमारत असावी म्हणून सायन्स पार्कसमोर जागा निश्चित झाली आहे.
















