न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुढाकार घेतला असून विद्यार्थी, विविध कंपन्या, पोलीस आणि इतर क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी प्रत्येक आठवड्याला जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
प्रत्येक बुधवारी सकाळी अकरा वाजता पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय, निगडी येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या निरक्षर लोकांपेक्षा साक्षर लोकांना सायबर गुन्हेगारीचा धोका अधिक आहे. डिजिटल इंडिया या संकल्पनेतून सर्व व्यवहार डिजिटल झाले आहेत. सोशल मीडियामुळे प्रत्येकजण इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे.
प्रत्येक अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर संबंधित अॅप्लिकेशन युजरकडून त्याच्या संपर्क, मीडिया गॅलरी आणि अन्य बाबींची परवानगी मागते. ती परवानगी दिल्यास मोबाईल मधील सर्वडेटा संबंधित अॅप्लिकेशनसोबत शेअर होतो. त्यास अधिकृतपणे नागरिकांनीच संमती दिली असल्याने पुढील संभाव्य धोक्याच्या वेळी नागरिकांना ते अडचणीचे ठरते. मेट्रोमोनीयल साईटवरून फसवणूक, सेक्सटॉर्शन, इन्स्टंट लोन अँप, ऑनलाईन गेमिंग अॅप मेसेजमधील लिंक, क्युआर कोड अशा अनेक मार्गाांनी सायबर गुन्हेगार गुन्हे करीत आहेत.
आयुक्तालय हद्दीतील शाळांमधील प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी प्रतिनिधी, कंपन्यांमधील प्रतिनिधी, पोलीस आणि अन्य प्रशासनातील प्रतिनिधींना बोलावून त्यांना सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर हे प्रशिक्षणार्थी त्यांच्या शाळा, महाविद्यालय आणि कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सहकाऱ्यांना जागृत करतील. सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांचे यात मार्गदर्शन होणार आहे. यात व्याख्यान, बोधवाक्य, पीपीटी प्रेझेंटेशन, पोस्टर आदींद्वारे माहिती दिली जाणार आहे.
मोबाईलमध्ये आवश्यक तेवढेच अॅप्लिकेशन डाऊनलोड करावेत. एखाद्या अॅपने डाऊनलोड करताना परवानगी मागितल्यास ती कशासाठी परवानगी मागत आहे, याची खात्री करणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसह सर्व घटकातील प्रतिनिधींसाठी मार्गदर्शन उपक्रम सुरु केला आहे.
















