- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा पालिका कर्मचाऱ्यांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी पदोन्नती, बदल्यांसंदर्भातील तक्रारी, सेवानियतन बदल, पदोन्नती निकषांत बदलांसह अन्य तक्रारी परस्पर राज्य शासनाकडील विभागांकडे सादर करतात. ही कार्यप्रणाली कार्यालयीन शिस्तीस धरून नाही. यापुढे महापालिकेव्यतिरिक्त अन्य प्राधिकरणांकडे अर्ज परस्पर सादर करू नयेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
महापालिकेत सुमारे आठ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांच्या सेवाविषयक बाबींसंदर्भात वैयक्तिक तक्रारी, पदोन्नती, बदल्यांसंदर्भातील तक्रारी, सेवानियमांत बदल अन्य प्रकारच्या तक्रारी असतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या तक्रारी नियंत्रण अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, काही अधिकारी, कर्मचारी शासनाकडे परस्पर तक्रारी करतात. त्यांना आयुक्तांनी सज्जड दम भरला आहे.
महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सेवाविषयक बाबींसंदर्भात वैयक्तिक तक्रारी, पदोन्नती, बदल्यांसंदर्भातील तक्रारी, सेवानियमांत बदल, पदोन्नती निकषांत बदल अथवा अन्य प्रकारच्या तक्रारी नियंत्रण अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच सादर कराव्यात. प्राधिकरणांकडे असे अर्ज परस्पर सादर करण्यात येऊ नयेत. अन्यथा महापालिका प्रशासनास वेठीस धरणाऱ्या अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची कृती गंभीर स्वरुपाची ग्राह्य धरण्यात येणार आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.


















