न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सहभाग घेतला असून त्याअनुषंगाने नोव्हेंबर २०२२ या महिन्यात क्षेत्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची निवड करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज सबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यामध्ये अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांनी प्रथम, ड क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी द्वितीय तर ब क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक स्विकारले, अशी माहिती स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक यांनी दिली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, महापालिकेचे सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला देशात सर्वप्रथम आणण्यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने त्यांनी केलेल्या कामकाजाचे काही निकषांच्या आधारावर गुणांकन देण्यात आले आहे. यामध्ये वर्गीकृत कचरा संकलन – कचऱ्याचे वर्गीकरण आणि संकलन करणे, सार्वजनिक क्षेत्रातील साफसफाई करणे, सिंगल युज प्लास्टिकचा कमी वापर किंवा बंदी, महापालिकेच्या सफाई कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देणे, ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान प्रत्येक महिन्याला किमान एक शून्य कचरा कार्यक्रम राबविणे, नॉन बल्क जनरेटर्सद्वारे साईटवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे तसेच बल्क जनरेटर्सद्वारे साईटवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशा निकषांच्या आधारावर त्यांचे मुल्यांकन करण्यात आले असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक यांनी दिली.


















