- लाच प्रकरणी झाली होती अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- महापालिका स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांना लाच प्रकरणी अटक झाली होती. त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रशासक शेखर सिंह यांनी रद्द केले. निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सिंह यांनी निलंबन रद्दचा निर्णय घेतला असून त्या कर्मचाऱ्यांना अकार्यकारी पदावर व जनसंपर्क ठेवता येणार नाही, अशा ठिकाणी पदस्थापना देण्यास मान्यता दिली आहे.
कामाची ‘वर्क ऑर्डर’ मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी एक लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. १८ ऑगस्ट २०२१ रोजी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती कार्यालयात ही कारवाई केली होती.
त्यात स्थायी समिती अध्यक्षांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक तथा मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरिया, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना अटक झाली होती. कालांतराने त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यांना २० ऑगस्ट २०२१ रोजी आणि लिपिक प्रदीप कोठावदे व हबैती मोरे यांना २४ डिसेंबर २०२१ रोजी महापालिका सेवेतून निलंबित केले होते. त्यांचे निलंबन रद्द करून त्यांची अनुक्रमे शिक्षण विभाग, मोरवाडी आयटीआय, क्रीडा, कामगार कल्याण, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती केली आहे.
















