- उद्योजकांना दिलासा; घातक कचरा दिल्यास कठोर कारवाईचा आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील घनकचरा व्यवस्थापनाबाबत यापूर्वी वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे व त्यास अनुसरुन वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये तसेच दि. २१/१२/२०२२ रोजीच्या क क्षेत्रीय कार्यालयामध्ये लघुउद्योजक, उद्योजक व MCCIA यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सविस्तर बैठक घेण्यात आली. त्यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार महानगरपालिकेमार्फत औद्योगिक परिसरातील अघातक घनकचरा संकलन करण्याचे काम दि.२/०१/२०२३ पासून प्रत्यक्ष सुरु करण्यात आलेले आहे.
अधिनियमातील प्रचलित तरतूदी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश विचारात घेऊन औद्योगिक परिसरातील निर्माण होणा-या केवळ अघातक औद्योगिक कच-याचे संकलन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार घातक कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे औद्योगिक आस्थापनांवर बंधनकारक असल्याने, त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे उद्योजकांनी मान्य केलेले आहे. अशा स्वरुपाच्या घातक कच-याच्या अशास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावल्यामुळे पर्यावरणाची हानी होते तसेच त्यावर प्रक्रिया करणे या बाबींवर मोठा परिणाम होतो. तसेच ते कायद्याने निषिध्द आहे.
कचरा संकलनामध्ये त्यांच्या आस्थापनेतून निर्माण होणारा केवळ अघातक घनकचरा देणे आवश्यक राहील व कोणत्याही परिस्थितीत घातक कचरा मिश्र स्वरुपात देण्यात येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही औद्योगिक आस्थापनेद्वारे घातक कचरा महानगरपालिकेच्या संकलन व्यवस्थेत दिल्याचे आढळून आल्यास नाईलाजाने संबंधित आस्थापनेविरुध्द घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११५ नुसार फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल. उद्योजकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे सर्व औद्योगिक आस्थापनांना केले आहे.















