न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावाली बाबा यांच्या उरुसाला होणाऱ्या शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर लोहगड आणि घेरेवाडी परिसरात मावळच्या प्रांताधिकारी व पोलिस प्रशासनाच्या वतीने रविवारपर्यंत (दि. ८)जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
भारतीय पुरातत्त्व विभागाकडून या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली होती. पोलिसांच्या वतीनेही याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रांताधिकारी मावळ यांच्याकडून रविवारपर्यंत संचारबंदीचे आदेश बुधवारी उशिरा देण्यात आले. संचारबंदी दरम्यान आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले आहेत.
लोहगड किल्ला हे एक ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ आहे. हे ठिकाण २६ मे १९०९ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले असून, भारतीय पुरातत्त्व विभागाचे आधिपत्याखाली आहे.


















