- ठेकेदाराकडून निविदेतील अटी व शर्तीचा भंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल व पंपिंग स्टेशन बांधण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार व अनागोंदीचे आरोप झाले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने केलेली चौकशी व कायदा विभागाच्या अभिप्रायानंतर या निविदेत पात्र ठरलेल्या ठेकेदारावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. ठेकेदाराने निविदेतील अटी व शर्तीचा भंग केल्याचे कायदा विभागाच्या अभिप्रायावरून स्पष्ट होत आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भामा आसखेड धरणाजवळ जॅकेवल व पंपिंग स्टेशन बांधण्याच्या निविदा प्रक्रियेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने गंभीर आरोप केले होते. ज्यादा दराची निविदा, तसेच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई झालेल्या ठेकेदाराला हे काम दिले जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता. तसेच, भाजपचे आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांनीही तीव्र आपेक्ष नोंदविले होते. या प्रकरणावरून राष्ट्रवादी व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यानंतर या संदर्भात ठेकेदाराने ७२ तासांत खुलासा करावा, अशी नोटीस कार्यकारी अभियंता देवान्ना गट्टवार यांनी दिली होती.
त्या संदर्भात पाणीपुरवठा विभागाने पालिकेच्या कायदा विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला. कायदा विभागाने आपला अभिप्राय पाणीपुरवठा विभागाला नुकताच दिला आहे. यामध्ये संबधित ठेकेदार कंपनीने निविदा व अटी शर्थीनुसार आवश्यक असलेली कायदेशीर प्रकरणांची गेल्या पाच वर्षांतील माहिती लपविलेली आहे. निकृष्ट कामाबद्दल निलंबित केल्याची माहिती निविदा भरताना दिली नाही. त्यामुळे निविदा व अटी शर्थीचे उल्लंघन झाले आहे. कायदा विभागाचा अभिप्राय आयुक्तासमोर ठेवला जाणार आहे. त्यावरून आयुक्त त्या ठेकेदारावर कारवाई करतात की पात्र करतात, याची चर्चा सुरु आहे.


















