- बायोमेट्रिक हजेरीतून मिळाली सवलत; दहा दिवस हजेरीतून सूट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममधील निवासी डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरीतून सवलत दिली आहे. अनेकदा शस्त्रक्रिया अथवा इतर कामात व्यस्त असल्याने वेळेवर बायोमेट्रिक हजेरी लावता येत नाही. त्यामुळे ही सक्ती नको म्हणत डॉक्टरांनी काम बंद आंदोलन छेडले होते. त्या बाबत आयुक्त शेखर सिंह व वायसीएम पीजी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर महिन्यातून दहा दिवस हजेरीबाबत सूट देण्यात आली आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून पुर्वी सकाळी आठ ते रात्री आठ अशी कामाची वेळ ठरवून दिली होती. यामध्ये बदल करण्याची मागणी डॉक्टरांनी केली होती. त्या बाबतही सकारात्मक निर्णय झाला आहे. डॉक्टरांच्या मागणीनुसार सकाळी सहा ते दुपारी १२ आणि सायंकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत कामाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. गंभीर आजाराचे रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचारासाठी वेळ होत आहे. उपचारासाठी किती वेळ जाईल याची शाश्वती नसते. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेनूसार बायोमेट्रिक हजेरी लावता येत नाही. परिणामी डॉक्टरांची गैरहजेरी लागली जायची. ही अडचण पाहता बायोमेट्रिक हजेरीची सक्ती नको, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे या पूर्वीच निवेदन दिले होते. मात्र त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
२ जानेवारी रोजी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते. यामध्ये वायसीएममधील निवासी डॉक्टर, कर्मचारी अशा सुमारे १०० जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बायोमेट्रिक हजेरीची सक्ती नको ही प्रमूख मागणी करण्यात आली होती. महापालिका व रुग्णालय प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर महिन्यातून दहा दिवस सूट देण्यात आल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले.
” बायोमेट्रिक हजेरीमध्ये सवलत मिळावी ही आमची मुख्य मागणी होती. त्यामध्ये महिन्यातून दहा दिवस सवलत देण्यात आली आहे. कामाच्या वेळा देखील आमच्या मागण्यांनुसार ठरवून दिल्या आहेत. आयुक्त व रुग्णालय अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे ठरले आहे. त्यामुळे आम्ही नियमितपणे कामावर रुजू झालो आहे.
डॉ. अमोल राठोड, अध्यक्ष, महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना, वायसीएम…


















